लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांनी सोमवार दि. २० जूलै रोजी शहरातील झोन क्रमांक ‘बी’ मध्ये अचानक भेट देऊन स्वच्छतेच्या कामकाजाची पाहणी केली. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांच्या स्वच्छतेबाबत तक्रारी येऊ नयेत, असे निर्देश देतानाच कर्मचा-यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सोमवारी महापौरांनी झोन बी मधील प्रभाग क्रमांक १५,१६,१७ व १८ मध्ये अचानक भेट दिली. या भागात सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. प्रभागात कोठेही पावसाचे पाणी थांबणार नाही,याची काळजी घ्यावी. कचरा साठवून राहू नये तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. महानगरपालिकेच्या स्वच्छा विभागाने मान्सूनपूर्व स्वच्छतेचीकामे केली आहेत. शहरातील लहान, मोठे सर्वच नाल्यांची साफ-सफाई करण्यात आली आहे. कचरा, घाण, नाली तुंबणे, पावसाच्या पाण्याने पाण्याचे डबके साचून डासोत्पत्ती वाढू नये, साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्वच्छता विभाग आणि आरोग्य विभाग सतर्क आहेत.
पावसाळ्याचे दिवस आहेत. स्वच्छतेची कामे करताना कर्मचा-यांनी स्वत:चे आरोग्य सांभाळावे. सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कर्मचा-यांना गमबूट, हॅन्डग्लोव्हज व मास्क देण्यात आले आहेत. त्याचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी क्षेत्रीय अधिकारी रोहित पवार,मुख्य स्वच्छता निरीक्षक धोंडीराम सोनवणे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
















