लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालय, मराठवाडा संगीत कला अकादमी, दत्त मंदिर संस्थान, औसा रोड, लातूर, रोटरी क्लब, लातूर आणि डी. एस. ग्रुप, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाथी औसा रोडवरील दत्त मंदिर याठिकाणी आयोजित ‘सुरमयी दिपावली पहाट’ कार्यक्रमाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
या कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका गोकर्णा जाधव यांनी ‘नाम गाऊ नाम घेऊ’ हा संत तुकारामांचा अभंग गाऊन केली. यानंतर भाग्यश्री देशपांडे यांनी ‘माझी रेणुका माऊली’ हे भक्तिगीत सादर करून रसिक श्रोत्यांना स्वरानंदात डुंबविले. त्यांना तबलासाथ प्रा. विश्वनाथ स्वामी यांनी केली तर हार्मोनियम साथ प्रा. सूर्यकांत घोडके यांनी दिली.
याप्रसंगी सोलापूर येथील सुविख्यात युवा गायक अनिरुद्ध वाघचवरे यांनी ‘राग नंद’मध्ये विलंबित लयीमध्ये बडाख्याल व मध्यलयीमध्ये छोटाख्यालची बंदिश अतिशय तयारीने गायली त्यानंतर त्यांनी १५ मात्राचा पंचमसवारी तालामध्ये तुजविण कोण शरण जावो नारायणा हा अभंग आणि ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’ हे अभंग बहारदारपणे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबलासाथ प्रभाकर वाघचवरे यांनी केली तर हार्मोनियम साथ प्रा सूर्यकांत घोडके यांनी केली.त्यानंतर या दिपावली पहाट कार्यक्रमाप्रसंगी मुंबई येथील युवा सितारवादिका गरिमा आणि रिद्धीमा शेजाळ भगिनी यांनी राग चारुकेशी आणि राग रागेश्री मध्यलय व दृत तीनतालमध्ये बहारदार सितारवादन करून रसिकांची उत्स्फूर्त दाद घेतली.त्यांना तबलासाथ तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी केली तर हार्मोनियम साथ प्रा. सूर्यकांत घोडके यांनी दिली. या दिपावली पहाट कार्यक्रमाप्रसंगी मुंबई येथील युवा सितारवादिका गरिमा आणि रिद्धीमा शेजाळ भगिनी यांनी राग चारुकेशी आणि राग रागेश्री मध्यलय व दृत तीनताल मध्ये बहारदार सितारवादन करून रसिकांची उत्स्फूर्त दाद घेतली.त्यांना बहारदार तबलासाथ तालमणी डॉ राम बोरगावकर यांनी केली.
शेवटी सर्व श्रोते व कलावंत यांनी सार्वजनिक स्वरूपामध्ये ‘ओम नमो भगवते’, ‘दिगंबरा दिगंबरा’, ‘रघुपती राघव राजाराम’ या धून गाऊन दिपावली पहाटेचा आनंद द्विगुणित केला. या सूरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमाप्रसंगी आयोजक तालमणी डॉ. राम बोरगावकर ,डी. एस. ग्रुपचे संचालक तुकाराम पाटील, अमृत महाराज, प्रा. गणेश बोरगावकर, डॉ. बी. आर. पाटील, रमेश बिरादार, प्रा. सच्चिदानंद ढगे, सोमेश्वर स्वामी, श्रीमती वैद्य, सुनीता बोरगावकर, प्रा. नामदेव साठे, प्रा. विवेक ढगे, प्राचार्य डॉ. सुदाम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

