21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeलातूरहजारों लेकरांनी टेकला भीमाच्या चरणी माथा 

हजारों लेकरांनी टेकला भीमाच्या चरणी माथा 

लातूर : प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे शिल्पकार, मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. या महापरिनिर्वाणामुळे भारतीय बहुजनांचा प्राणवायू निघून गेला. या दु:खदायी घटनेत आज  ६९ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दि. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सामूहिक महाबुद्ध वंदना, अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अलोट गर्दीचा महासागर उसळला. हजारों लेकरांनी भीमाच्या चरणी माथा टेकला. लातूर जिल्ह्यातील बौद्ध उपासक, उपासिका आणि समस्त लातूरकर पांढ-या शुभ्र वस्त्रामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महामानव बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर  भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण व पंचशील देऊन समाजातील नैतिकता, सामूहिक एकता आणि मानवतावादाचा संदेश दिला. या प्रसंगी भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक नवभारताचे निर्माते आहेत. ६९ वर्षांपूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्याक्षणी भारताने एक अद्वितीय प्रतिभा, तत्त्वज्ञ आणि जननायक गमावला. त्यांच्या जाण्याने वंचित, शोषित, पीडित समाज पोरका झाला. परंतु आजही त्यांचे संविधान आणि दिलेला बुद्ध धम्म ही आमची पिढ्यानपिढ्यांची शिदोरी आहे. ६ डिसेंबर हा दिवस प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायी असून, करोडो लोकांच्या मनावर आजही त्याचा खोल परिणाम जाणवतो. बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नव्हता, तर तो संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीचा दिव्य संदेश होता. त्यांनी आयुष्यभर शोषित, पीडित, वंचित समाजाला आवाज दिला, स्वाभिमान दिला आणि माणूस म्हणून उभं राहण्याची ताकद दिली.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाने ६९ वर्षांपूर्वी देशाने एक युगप्रवर्तक विचारवंत गमावला, पण त्यांचे ध्येय, त्यांची तत्वनिष्ठा आणि मानवतावादी दृष्टी आजही अधिक तेजस्वीपणे मार्गदर्शक आहे. कार्यक्रमादरम्यान दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महामानवांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. ‘अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे!’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी भंते बोधिराज, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार विक्रम काळे, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार महादेव चिकटे, अभय साळुंके, अ‍ॅड. किरण जाधव, डी. एस. नरसिंगे, प्रोफेसर डॉ. संजय गवई, भीमराव चौदंते, अनंत लांडगे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, राहुल कांबळे, अशोक गोविंदपुरकर, आबासाहेब पाटील, इम्रान सय्यद, कैलास कांबळे, अ‍ॅड. देविदास बोरुळे, आसिफ बागवान, गोरोबा लोखंडे, इस्माईल शेख, प्रा. प्रविण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, नागसेन कामेगावकर, ज्योतिराम लामतुरे, केशव कांबळे, विनय जाकते, वैभव गायकवाड, डॉ. विजय अजनिकर, चिंटू गायकवाड, डी. उमाकांत, निखिल गायकवाड, करण ओव्हाळ, राहुल शाक्यमुनी, सचिन गायकवाड, अ‍ॅड. रोहित सोमवंशी, डॉ. जितेंद्र वाघमारे, सिद्धांत चिकटे, मिलिंद धावारे, सुजाता अजनीकर, पंचशीला बनसोडे, विद्या ससाणे, सुनीता सोनकांबळे, निर्मला मधाळे, सुमन उडानशिव यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, डॉक्टर, वकील, महार बटालियनचे आजी-माजी सैनिक, कर्मचारी तसेच महाविहार धम्मसेवक ग्रुपचे सदस्य, भारतीय बौद्ध सभेचे सर्व पदाधिकारी तथा बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR