कोल्हापूर : प्रतिनिधी
आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील मेसेज आणि व्हीडीओ पाठवल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपी चंदगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलद्वारे अश्लील मेसेज आणि व्हीडीओ पाठवण्यात आला होता. त्यांना अश्लील मेसेज पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. शिवाजी पाटील यांच्याकडे आरोपीने दहा लाखांची मागणी केली. यानंतर पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी तक्रार दाखल केली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी चंदगड पोलिसांनी कारवाई करत पवन पवार या तरुणाला ताब्यात घेतल्े आहे. आरोपी चंदगड येथील रहिवासी आहे. आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिस चंदगडमध्ये जाण्याची शक्यता आहे. शिवाजी पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आहेत. पाटील यांना भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती आहे.

