लातूर : प्रतिनिधी
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणा-या हल्लाखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन लातूर शहर जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या वतीने दि. ७ ऑक्टोबर रोजी लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये सरन्यायाधीश भूषण गवळी बेंच जवळ येत असताना सनातनी वकिलाकडून त्यांच्यावर बूट फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधान व पर्यायाने लोकशाही मूल्य नाकारणा-या प्रवृत्ती देशात वाडु नेय याची दक्षता घेणे व तसेच लोकशाहीचा कोणताही स्तंभ कमकुवत होणार नाही, याची काळजी घेणे ही आता काळाची गरज बनली आहे.
कारण आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था किती घट्ट आहे हे या कृतीवरून लक्षात येते. भारताच्या सर्वोच्च पदावर सरन्यायाधीश म्हणून काम करत असताना त्यांच्यासोबत हे होऊ शकते तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न पडतो. एका अनुसूचित जातीच्या सरन्यायाधीशांबाबत कोर्टाच्या रूममध्ये अशा पद्धतीने प्रकार होऊ शकतो हे संविधान व लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न आहे, असे जाणवते. जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या भारत देशात दुर्दैवाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा अवमान करणारी घटना घडली आहे. या घटनेचा तीव्र शब्दात लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभाग निषेध करते. सदरील हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने येणा-या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देण्यात आला.
यावेळी लातुर काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. प्रविण कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दगडूआप्पा मिटकरी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरोबा लोखंडे, प्रभाग अध्यक्ष आसिफ बागवान, जी. ए. गायकवाड, अंगद वाघमारे, बिभीषन सांगवीकर, भालचंद्र पाटील, अथरोद्दिन काजी, पवनकुमार गायकवाड, किरण बनसोडे, राजू गवळी, संजय ओव्हाळ, अशोक सूर्यवंशी, अॅड. गणेश कांबळे, विजय टाकेकर, यशपाल कांबळे, बालाजी पतंगे, कमलताई शहापुरे, मीनाताई टेनळे, सायरा पठाण, शोभाताई ओव्हाळ इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

