लातूर : प्रतिनिधी
इरा देऊळगावकर यांची, इंग्लंडच्या इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज संस्थेमध्ये हवामान असुरक्षिततेवर पीएच. डी. करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. ब्रायटन येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स’शी संलग्न असलेली ‘इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’ही संस्था, विकासविषयक संशोधनात जगात अग्रस्थानावर आहे. इरा देऊळगावकर यांनी या संस्थेतून ‘विकासावरील अभ्यास’ विषयात विशेष प्राविण्यासह पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यावेळी त्यांनी मराठवाड्यातील शेती संकटाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आहे. त्यांनी सहभागी कृती आधारित संशोधन(पार्टिसिपेटरी अॅक्शन रिसर्च) या पद्धतीचा अवलंब करून ७० शेतकरी विधवांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्याविषयी त्या ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या ‘पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी)’ मध्ये लेखन करत आहेत. त्यानंतर त्या इंग्लंडमधील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’ या संस्थेसाठी ‘हवामान बदलामुळे महिलांची असुरक्षितता कशी वाढत आहे? याचा अभ्यास करून अहवाल आणि निबंध लेखन केले.
हवामान बदलामुळे होत असलेल्या हानीबद्दल त्यांचे १३ संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. ‘हवामान संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाकू येथील ‘जागतिक हवामान परिषदे’त त्यांचा असुरक्षिततेला सामो-या जाणा-या महिलांसाठी सामाजिक सुरक्षेची निकड’ हा निबंध सादर केला होता. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘हवामान न्याय आणि लिंगाधारित असुरक्षितता’ या विशेष आवृत्तीसाठी त्यांना अतिथी लेखिका म्हणून आमंत्रित केले होते. नुकतेच ‘ऑक्सफर्ड डेव्हलपमेंट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या शोधनिबंधास सर्वोत्तम म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. इरा देऊळगावकर या ‘आर्थिक हानी पलीकडे, हवामान असुरक्षिततेचे लिंगाधारित पैलू’ या विषयावर संशोधन करणार आहेत. हवामान बदलामुळे महिलांची मापन न करणारी हानी कशी होत आहे? याचा अभ्यास करताना त्या कष्टकरी महिलांना त्यात सहभागी करून घेणार आहेत.

