कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा आपण लवकरच राजीनामा देणार असल्याचे सूतोवाच, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगली येथील कार्यक्रमात सोमवारी रात्री केले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी मंत्री मुश्रीफ हे सांगलीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आपण दहा वर्षे अध्यक्ष आहोत. राज्याच्या मंत्रिमंडळातही अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यातच मुलगा नविद मुश्रीफ हे नुकतेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष झाले आहेत. सगळीच पदे घरात नको म्हणून आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचा अध्यक्ष कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहिले तर ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, राजेश पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. मित्रपक्षांना संधी द्यायची म्हटली तर काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची नावे पुढे येऊ शकतात.
मुश्रीफ सर्वाधिक काळ अध्यक्ष
हसन मुश्रीफ हे गेली ४० वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी साडेतेरा वर्षे ते बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेच्या इतका प्रदीर्घ काळ अध्यक्ष होणारे ते एकमेव आहेत.

