अहमदपूर : रविकांत क्षेत्रपाळे
या तालुक्यातील हाडोळती येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. जवळपासच्या आठ दहा गावांतील लोक बाजार करण्यासाठी येतात. येथे बस थांबण्यासाठी आणि बस मध्ये प्रवाशांना चढणे- उतरणे व उभारण्यासाठी अजिबात जागा नाही. आजूबाजूस सगळे बिन भाड्याचे फळ विक्रेते, दुकानदार आपला व्यवहार थाटून बसले आहेत. वाहनांची प्रचंड गर्दी असून येथे अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. येथील ग्रामपंचायत ने त्वरित अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हाडोळती हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. आठवडी बाजार ,शाळा, कॉलेज, सरकारी दवाखाना, खाजगी दवाखाने यासाठी बस स्थानकावर नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. येथे बाजूला देशी दारूचे दुकान आहे. लग्नसराईच्या दिवसात बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या फर्निचरचे दुकान, कपड्याचे, किराणा दुकान मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे सतत गर्दी असते. बस स्थानकाच्या बाजूस सर्व मोठे कृषी दुकाने असल्यामुळे शेतक-यांची गर्दी असते. या रस्त्यावर शाळा ,महाविद्यालये असल्यामुळे येथे नेहमीच प्रचंड गर्दी असते. याच रोडवर पुढे पेट्रोल पंप, विद्युत मंडळाचे कार्यालय आहे.
हाडोळती बस स्थानकावर एका बाजूला अनेक हॉटेल आहेत. समोर पान टपरी ,फळाचे, भाजीपाल्याची दुकाने ही चक्क रस्त्यावर लावण्यात आली आहेत. येथे बाजूला गॅस वितरणाचे दुकान आहे. बस स्थानकावर उतरून गावात जाणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानाची लाईन असल्यामुळे येथील दुकानावर, चहाच्या हॉटेलवर, पान टपरीवर नेहमीच गर्दी -वर्दळ असते. यामुळे बस स्थानकावर प्रवाशांना उभा राहण्यासाठी अजिबात जागा नाही. येथे शाळा कॉलेजच्या मुला-मुलींना बसस्थानक बांधलेले नसल्यामुळे गाड्या कुठेही अलीकडे व पलीकडे जेथे जागा आहे तिथे थांबतात. अशावेळी प्रवासी धावपळ करून गाडीत बसण्याचा प्रयत्न करतात. महिलांना मुलींना चक्क हॉटेलच्या पान टपरीच्या समोर बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागते.
या बस स्थानकाच्या परिसरात जगळपूर, कुमठा, शिवनखेड, हंगरगा, शेलदरा, उंबरगा, बाबळधरा जाणारी टमटम -जीप थांबून असतात. बसस्थानकाशेजारी उभारलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालय आहे. येथेच तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय असून बाजूला पोस्ट ऑफिस आहे. या बस स्थानकाच्या रोडवर शिरूर रोडवर सिमेंट ,वाळू, सळईची मोठी दुकाने आहेत, बँक आहे. यामुळे या परिसरात ट्रॅक्टर ,ट्रक या वाहनांची व नागरिकांची गर्दी असते. एकंदरीत बस स्थानकावर अनेक कार्यालये असल्यामुळे नागरिकांची, वाहनांची, दुचाकी ,कार, जीप यांची सतत वर्दळ असते. बाजूलाच पोलीस चौकी आहे. या वर्दळीमध्ये नागरिक ,महिला ,मुली, वयस्कर नागरिक यांची प्रचंड गैरसोय व अडचण होत आहे.
















