मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट केले आहे. यात त्यांनी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही, हा खेळ महाराष्ट्राला जाळून टाकेल अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
दरम्यान, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतकेच नाहीतर तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्यहनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे.
कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणतेही संतसाहित्य उघडून बघा; संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा; संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही. किंबहुना, या सर्वांची शिकवणच होती की, सर्व धर्मांनी एकत्र राहिले पाहिजे. असे असताना महंत रामगिरी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता, हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले, असेच होते. मी जे म्हणतोय त्याला अर्थ आहे.
कारण, मागे स्वत: मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिंमत दाखवत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. ते जाऊ द्या!