मुंबई : प्रतिनिधी
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, ६ सप्टेंबर रोजी आयटी कर्मचा-यांसह स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला. हिंजवडीतील इन्फोसिस सर्कल, फेज-1 परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली.
हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. खराब रस्ते, खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपु-या सार्वजनिक वाहतूक सुविधा, प्रदूषण आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत विविध आयटी कंपन्या, कर्मचारी संघटना आणि स्थानिक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी परिसरात सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. इन्फोसिस सर्कल, हिंजवडी फेज-1 पासून वर्तुळाकार पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हिंजवडी, माण, मारुंजी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकही सहभागी झाले.
वर्षभरापासून पायाभूत सुविधांची प्रतीक्षा
आयटी क्षेत्रातील विविध संघटनांच्या म्हणण्यानुसार, हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप अपेक्षित स्तरावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंर्त्यांनी तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, देशातील महत्त्वाच्या आयटी हबपैकी एक असलेल्या हिंजवडी परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
खराब रस्त्यांमुळे कर्मचारी आणि नागरिक त्रस्त
असोसिएशनचे पवनजीत माने यांनी सांगितले की, हिंजवडी आयटी क्षेत्रात दररोज दूरदूरवरून हजारो कर्मचारी कामासाठी येतात. मात्र, परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दररोजच्या प्रवासात अनेक तास खर्च होत असल्याने कर्मचा-यांच्या कामावर आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. रस्त्यांवरील खड्डे, अपघात, वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यामुळे हिंजवडी परिसरातील परिस्थिती गंभीर बनल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
हिंजवडीतील रहिवासी प्रशांत भोपळे यांनीही परिसरातील समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली. अरुंद रस्ते, खड्डे आणि सततची वाहतूक कोंडी ही येथील नागरिकांची दैनंदिन समस्या बनली आहे. विशेषत: लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
















