अहिल्यानगर : गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये झालेल्या एका आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात एका बहुचर्चित नृत्यांगनेने आत्महत्या केली असून त्या प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीचा संबंध थेट भाजपाशी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात केलेली एक सोशल पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी संबंधित नृत्यांगनेबाबत व या प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीबाबत माहिती दिली असून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. हेच का पार्टी विथ डिफरन्स? असा सवालदेखील रोहित पवार यांनी केला आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमध्ये एका बहुचर्चित नृत्यांगनेने एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे. सदर नृत्यांगना अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात वास्तव्यास होती. शुक्रवारी सकाळी बाजारात जात असल्याचे सांगत सदर ३५ वर्षीय महिला घराबाहेर पडली, पण बराच वेळ होऊनही न परतल्यामुळे तिला सोडणा-या रिक्षाचालकाशी महिलेच्या मैत्रिणींनी संपर्क साधला. तेव्हा तिला शहरातल्या एका लॉजवर सोडल्याचे रिक्षाचालकाने सांगितले. लॉजवर पोहोचल्यानंतर महिलेची खोली आतून बंद असल्याचे आढळून आले. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यानंतर आत सदर महिलेचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
दरम्यान, रोहित पवार यांनी या प्रकरणाबाबत भाष्य करणा-या दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात शुक्रवारी दुपारी केलल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. ‘‘जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलेलं नाही. अशातच जामखेडमध्ये लॉजमध्ये आत्महत्या झाल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी’’, अशी मागणी रोहित पवार यांनी पोस्टमधून केली आहे.

