18.4 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeमहाराष्ट्रहे कसलं प्रखर हिंदुत्व, ही तर सौदेबाजी

हे कसलं प्रखर हिंदुत्व, ही तर सौदेबाजी

पालघर : प्रतिनिधी
पालघर साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या काशिनाथ चौधरी यांना भाजपने पक्षात प्रवेश दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादळाने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मागील काळात याच प्रकरणावरून भाजपने चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र अचानकच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. वाढत्या टीकेमुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी तातडीने काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. आता पालघर प्रकरणावरून शिवसेनेकडून मित्र पक्ष भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या आध्यात्मिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पालघर साधूंच्या हत्येतील आरोपीला पक्ष प्रवेश देऊन तात्काळ स्थगिती दिल्याने हे कसलं हिंदुत्व? असा सवाल उपस्थित करत अक्षय महाराज भोसलेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अक्षय महाराज भोसले म्हणाले की, हे कसले प्रखर हिंदुत्व? हिंदुत्व म्हणजे तडजोडींचा बाजार नव्हे, तर सिद्धांतासाठी अग्नितही उभं राहण्याचं धैर्य. जे साधूंच्या रुधिरावर राजकीय गणितं मांडतात, त्यांनी जाणून घ्यावे हिंदुत्व हे पक्षांच्या सिग्नलला हिरवा, पिवळा, लाल दाखवणारे दिवे नाहीत. हिंदुत्व म्हणजे निखळ सत्य, न्याय आणि निर्भयतेचे धर्मयुद्ध आहे. जर साधूंच्या हत्येवर आरोप करणा-या व्यक्तीस प्रवेश देत असतील, तर हा व्यवहार हिंदुत्वाचा नव्हे तर राजकारणाच्या रंगभूमीवर केलेल्या ढोंगी अभिनयाचा पुरावा आहे. हिंदुत्वाच्या मार्गावर चालायचं असल्यास पहिली अट स्पष्ट होती, की सत्याशी समझोता नाही, आणि हिंदुत्वावर सौदेबाजी नाही. आता प्रवेशाला स्थगिती. ‘देर आये दुरुस्त ना आये’ असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास : काशिनाथ चौधरी भावूक
दरम्यान, भाजपमधून प्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर काशिनाथ चौधरी हे चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. काशिनाथ चौधरी म्हणाले की, प्रसार माध्यमांवर येणा-या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास झाला. समाज माध्यमांवर प्रतिमा मलिन केली जात आहे. आमचे जगणे मुश्किल केले आहे. व्यक्तिगत मी सगळे सहन केले असते. मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे. अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. या राजकारणासाठी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झाले तरी चालेल. परंतु यात माझे कुटुंब, माझी मुले भरडले जात आहेत. मी पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे गेलो होतो. मात्र मलाच आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR