नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्रायल-इराण युद्ध ११ दिवसांपासून सुरू आहे आणि अमेरिकेच्या प्रवेशानंतर ते अधिक तीव्र झाले आहे. इराणच्या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, इराणी संसदेनेही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यास घाईघाईने मान्यता दिली आहे. हा एक जगातील प्रमुख सागरी तेल मार्ग आहे, ज्याद्वारे जगातील कच्च्या तेलाचा २६ टक्के व्यापार होतो. यामध्ये व्यत्यय आल्यास तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते आणि महागाई वाढू शकते.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर भारतावर त्याचा परिणाम काय होईल याविषयी सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे. या चर्चांवर बोलताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे की, त्यातील व्यत्ययाचा देशावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच पुरवठ्यावरदेखील याचा कोणताही परिणाम नाही.
अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हल्ले वाढवले असताना, रविवारी इराणच्या संसदेने जागतिक तेल आणि वायू व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यास मान्यता दिली. या धमकीनंतर काही तासांतच, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक निवेदन जारी करून भारतीयांना आश्वासन दिले की,’’आमची ऊर्जा सुरक्षा अबाधित राहील.आमचा तेल पुरवठा विविध करण्यात आला आहे आणि बहुतेक पुरवठा होर्मुझमधून होत नाही आणि अशा परिस्थितीत पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही’’ असे म्हटले आहे.
हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये,’आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या काही वर्षांत आमच्या तेल पुरवठ्यात विविधता आणली आहे आणि आता आमच्या पुरवठ्याचा मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही.’ असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, आमच्या तेल वितरण कंपन्यांना अनेक आठवड्यांचा तेल पुरवठा असतो आणि तो इतर अनेक मार्गांनी आणला जात आहे. पेट्रोलियम मंर्त्यांनी भारतीयांना, आम्ही आमच्या नागरिकांना इंधन पुरवठ्याची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलू’’ असे आश्वासन दिले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी का खास आहे. कारण जगातील कच्च्या तेलाच्या व्यापारासाठी हा एक प्रमुख सागरी मार्ग आहे, जो इराणच्या नियंत्रणाखालील क्षेत्र आहे. या मार्गाने आखाती देशांमधून कच्च्या तेलाचा आणि वायूचा पुरवठा केला जातो. समोर आलेल्या माहितीनुसार, जर यामध्ये काही व्यत्यय आला किंवा तो बंद झाला तर त्याचा परिणाम अमेरिका तसेच भारतासह अनेक युरोपीय देशांवर स्पष्टपणे दिसून येतो.
भारतावर होणार परिणाम?
जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार असलेला भारत, त्याच्या कच्च्या तेलाच्या सुमारे ४०% आणि जवळजवळ अर्धा वायू होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आयात करतो, परंतु यावरील वाढत्या संघर्षादरम्यान, भारताने आधीच एक मोठे पाऊल उचलले आहे आणि आता मध्य पूर्व पुरवठादारांपेक्षा रशिया आणि अमेरिकेकडून जास्त तेल आयात करत आहे. जूनमध्ये, रशियाकडून भारताची तेल आयात मे महिन्याच्या तुलनेत दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.