Homeमहाराष्ट्र१०२ संवर्गातील पदांची लोकसेवा आयोगाकडून भरती

१०२ संवर्गातील पदांची लोकसेवा आयोगाकडून भरती

नियमांमध्ये मोठा बदल, सरकारी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

परीक्षांची संख्या कमी,
पदांची संख्या वाढणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, यासाठी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होणार आहे. या सुधारणांमुळे सेवाप्रवेश नियमांमध्ये मोठे बदल होणार असून सेवांतर्गत पदोन्नतीसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार भरती प्रक्रियेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य प्रशासन अनेक संवर्गांमध्ये विभागलेले असून यात ३३ विभागातील सुमारे ११० आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत. या संरचनेत सरळसेवा भरतीसंदर्भात १ हजार ४०० हून अधिक सेवाप्रवेश नियम आहेत. यातून विविध विभागांमधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. आता त्याऐवजी परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे.

या निर्णयानुसार सेवाप्रवेश नियमांमध्ये व्यापक बदल होऊन विविध संवर्गांच्या ५७४ सेवाप्रवेशांचे नियम बदलणार आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्ये आणि प्राधान्य निकषांचे सुसूत्रीकरण यांचा समावेश असून विविध संवर्गांतील विसंगती दूर करण्यात येणार आहेत. समान स्वरूपाच्या संवर्गांसाठी वेगवेगळ््या अनुभवाच्या अटी असल्याने परीक्षांची संख्या अनावश्यकरीत्या वाढत होती. त्यामुळे शैक्षणिक आणि अनुभव निकष अधिक सामायिक, सुसंगत आणि तर्कसंगत करण्यात येणार आहेत.

यापुढे सर्वसाधारणपणे सरळसेवा भरतीसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही. महाराष्ट्र नागरी सेवा, राजपत्रित गट-अ आणि गट-ब परीक्षा पद्धतीचा विस्तार करण्यात येणार असून या दोन्ही परीक्षा योजनेअंतर्गत ६ सेवांमधील एकूण ५७ संवर्गांमध्ये पदभरती केली जाते. सुधारणेनंतर या सेवांमध्ये ४५ संवर्गांचा नव्याने समावेश करून याअंतर्गत एकूण १०२ संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे.

गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक गटात वर्गीकरण करण्यात येणार आहे. कर्तव्ये आणि जबाबदा-या विचारात घेऊन प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या २६९ संवर्गांचे १८ गट तर तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असलेल्या २२१ संवर्गांचे ३० गट करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

आणखी १८ नवीन
सेवा निर्माण करणार
नवीन सेवा-संयुक्त परीक्षांच्या आयोजनात सुसूत्रीकरण करण्यात येणार असून विविध प्रशासकीय विभागातील समान संवर्गांच्या वर्गीकरणाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणा-या सध्याच्या सेवांव्यतिरिक्त आणखी १८ नवीन सेवा निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काही पदे अंतर्गत
पदोन्नतीने भरणार
नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही राजपत्रित संवर्गातील पदे मुलाखतीने भरण्याऐवजी अंतर्गत पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत. प्रशासकीय कामकाज आणि शासकीय व्यवहारात माहिती-तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काही संवर्गांची कर्तव्ये आणि जबाबदा-या आता कालबा ठरल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीयदृष्टया अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना कालबा संवर्ग म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण
असणारी पदेही भरणार
यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण असलेली नवीन पदे निर्माण करण्याचा आवश्यकतेनुसार विचार होणार आहे. अराजपत्रित संवर्गांसाठी मुलाखत न घेण्याचे धोरण लागू करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR