रामटेक : तब्बल दोन महिन्यांपासून दररोज दोन चमचे पाण्यावर जिवंत असलेल्या एका आजींचा मृत्यू झाला. इकडे कुटुंबीयांनी नातेवाईकांना निरोप दिला, अन्त्यविधीचा वेळ ठरवला गेला, सोशल मीडियावर निधन वार्ता शेअर करण्यात आली, अन्त्यविधीच्या तयारीला सुरुवात केली, इतक्यात अचानक आजींनी पाय हलवले आणि कुटुंबियांच्या जीवात जीव आला. या आजीचे नाव गंगाबाई सावजी साखरे (वय १०३ वर्षे) असे असून त्या मूळच्या रामटेक शहराजवळच असलेल्या चारगाव येथील आपल्या मुलीकडे राहतात.
गंगाबाईंच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाबाई या तब्बल दोन महिन्यांपासून दररोजचे दोन चमचे पाणी यावर जिवंत आहेत. १२ जानेवारीला दुपारी पाच वाजता अचानक गंगाबाईंच्या शरीराच्या अवयवांच्या हालचाली बंद पडल्या. त्या मृत झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले व त्यांनी अन्त्यविधीच्या प्रक्रियेला सुरुवात केली.
कुटुंबियांना फोनवर माहिती देण्यात आली, सोशल मीडियावर निधनाची वार्ता पाठवण्यात आली. दुस-या दिवशी म्हणजे १३ जानेवारीला सकाळी दहा वाजता अन्त्ययात्रेचा वेळ ठरवण्यात आला, शववाहिनी सांगण्यात आली. एवढी सर्व कामे आटोपवल्यावर घरी लोक जमले असता, सायंकाळी ७ वाजता अचानक गंगाबाईंनी आपल्या पायाची बोटे हलवली. गंगाबाई जोराने श्वास घ्यायला लागल्या व येथे एकच गोंधळ उडाला. अनेकांचा यावर विश्वासच बसेना. गंगाबाईंना जिवंत पाहताच थक्क झाले. गंगाबाई जिवंत असल्याची माहिती सर्वांना देण्यात आली. गंगाबाई जिवंत असल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तर दुसरीकडे या चमत्काराने लोक अवाक् झाले.

