लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात वाढते अपघाताचे प्रमाण आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने लातूर पोलीस विभागाच्या वतीने दि. १ सप्टेंबर पासून हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर विनाहेल्मेट दुचाकी चालविणा-या वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून, दि. १३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ९१९ केसेस करण्यात आल्या आहेत. तर हेल्मेट सक्ती सुरू झाल्यापासून आतापर्यंत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर १० हजार ९७७ केसेस करण्यात आल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी हेल्मेट वापराला पर्याय नाही. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर हा केवळ पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी नव्हे, तर स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे आवश्यक आहे. हेल्मेट वापरण्याची सवय प्रत्येक दुचाकीस्वाराच्या अंगवळणी पडणे ही काळाची गरज आहे. दुचाकीवरून प्रवास करताना प्रत्येक वेळी दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा. स्वत:चा जीव सुरक्षित ठेवण्याबरोबरच आपल्या कुटुंबाचेही संरक्षण करावे. हेल्मेट हे ओझे नसून, आपल्या कुटुंबाचे सुरक्षा कवच आहे. नागरिकांनी हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सुरक्षित वाहतुकीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
















