लातूर : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तयारीच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशानूसार लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका २०१७ च्या प्रभागरचनेप्रमाणेच होणार असून त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी १० टक्के लोकसंख्या वाढ झाली तर प्रभागाची रचना कमी-अधिक करण्यास मुभा देण्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेनूसार लातूर शहराच्या ३ लाख ८२ हजार ९४० लोकसंख्येनूसार २०१७ मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती. शहरामध्ये एकुण १८ प्रभाग आहेत. त्यापैकी १६ प्रभागांत (प्रभाग १ ते १६) प्रत्येकी ४ सदस्य संख्या होती तर २ प्रभागांत (प्रभाग १७ व १८) प्रत्येकी ३ सदस्य संख्या आहे. १८ प्रभाग आणि ७० सदस्य संख्या आहे. यानूसार प्रभाग रचना होती. याप्रमाणेच येणा-या निवडणुकीतही प्रभाग रचना उत्तर पुर्व भागातून पश्चिमेकडे जाऊन दक्षिणेकडे समारोप होणार आहे. पण काही प्रभागाच्या सीमा बदलू शकतात. पुर्वीप्रमाणे सीमा न राहता कमी-अधिक होऊ शकतात. पण सगळ्याच प्रभागाच्या सीमांत बदल होईल, असे नाही.
महानगरपालिकेच्या निवडणुकीकरीता प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या मान्यतेने ही प्रभाग रचना असणार आहे. या करीता जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. पण सर्व प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पुर्ण करुन जिल्हाधिकारी यांना सादर करावी, असे आदेशाही शासनाने दिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत मॅन्युयली प्रभाग रचना केली जात होती. पण यावेळेस मात्र गुगल अर्थचा नकाशा वापरला जाणार आहे. प्रत्येक प्रभागाचा स्वत्रंत्र नकाशा केला जाणार आहे. त्याच्या हद्दी देखील स्पष्ट दाखवल्या जाणार आहेत. प्रभाग रचना करताना कोठेही चूक राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेशही शासनाने दिले आहेत.