23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्र१० लाख साहित्यप्रेमींनी संमेलनास दिली भेट

१० लाख साहित्यप्रेमींनी संमेलनास दिली भेट

आठ कोटी ७२ लाख रुपयांची पुस्तकविक्री

पुणे : प्रतिनिधी
सातारा येथे आयोजित करण्यात आलेले शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. चार दिवसांत साता-यासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून तसेच देश-विदेशातून जवळपास १० लाख साहित्यप्रेमींनी संमेलनास भेट दिली असून जवळपास आठ कोटी ७२ लाख रुपयांची पुस्तकविक्री झाली आहे.

पुस्तक दालनाचे यंदाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे पुस्तकांचा आणि पुस्तक खरेदीसाठी येणा-या साहित्यरसिकांचा तब्बल २५ कोटींचा तर फर्निचर आणि इतर साहित्याचा चार कोटी ३० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता.

संमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात पुस्तके, पुस्तक दालन आणि पुस्तक खरेदीसाठी येणा-या साहित्यप्रेमींचा विमा उतरविणारे हे पहिलेच संमेलन ठरले आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितली

योग्य नियोजनाअभावी साहित्य संमेलनात पुस्तक, ग्रंथविक्री होत नाही, अशा तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते करीत होते. यावर यंदा तोडगा काढण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग ग्रंथ दालनातूनच ठेवण्यात आल्यामुळे संमेलनास येणारा प्रत्येकजण ग्रंथ दालनातूनच जात-येत होता. मुख्य मंडपासह परिसंवाद-परिचर्चेसाठी उभारलेला दुसरा मंडप तसेच बाल-कुमार वाचककट्टा, गझल-कवी कट्टा, पुस्तक प्रकाशन मंच येथे चारही दिवस आयोजित केलेल्या प्रत्येक उपक्रमाला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसले. गर्दीच्या दृष्टीनेही हे संमेलन विक्रमी ठरले.

साहित्य रसिकांनी संमेलनास मोठ्या संख्येने हजेरी तर लावलीच पण शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चारही दिवस संमेलनात हजेरी लावली. संमेलन कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसह दहा लाख साहित्य रसिकांनी भेट दिली. त्याचा सकारात्मक परिणाम पुस्तक विक्रीवर झाल्याचे दिसून आले आहे. बालवाङ्मयापासून ऐतिहासिक कादंब-या, कथा, कविता, समीक्षात्मक पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके प्रदर्शनात असल्यामुळे सर्व प्रकारच्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. एकंदरीत आठ कोटी ७२ लाख रुपयांची पुस्तक विक्री झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी दिली.

सातारा शाखेतर्फे २५ कोटी रुपयांचा विमा
संमेलनात पुस्तक आणि पुस्तक दालनात येणा-या साहित्य रसिकांचा ओरिएंटल इन्शुरन्सच्या सातारा शाखेतर्फे २५ कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला तर बुक स्टॉल, तेथे असलेल्या फर्निचरसाठी ४ कोटी ३० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. संमेलनाचे मुख्य चार दिवस आणि त्याआधीचे तीन दिवस असा सात दिवसांचा विमा उतरविण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR