लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतींनी आपल्या सर्वच कार्यक्षेत्रात प्रभावीपणे काम केले आहे. अशा १० गावांची आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड झाल्याचे लातूर जिल्हा परिषषदेच्या परिषदेच्या प्रशासनाने जाहिर केले आहे. सदर ग्रामपंचायती या तालुका स्तरीय स्मार्ट ग्राम बनल्या आहेत.
आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव २०२२-२३ पुरस्कारासाठी तालुका स्तरीय समित्या नेमण्यात आल्या होत्या. सदर समित्यांनी दुस-या तालुक्यात जाऊन ग्रामपंचायतींचे राबवलेल्या उपक्रमानुसार गुणांकणाची तपासणी केली होती. त्यानुसार तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कारात लातूर तालुक्यातील सिकंदरपूर, अहमदपूर तालुक्यातील सताळा, जळकोट तालुक्यातील शेलदारा, उदगीर तालुक्यातील बामणी, देवणी तालुक्यातील आंबेगाव, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी, निलंगा तालुक्यातील काटेजवळगा, औसा तालुक्यातील तांबारवाडी, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, चाकूर तालुक्यातील तिवघाळ या गावांची निवड झाली आहे.
सदर समिती ग्रामपंचायतीने गावात स्वच्छतेचे उपक्रम राबवून सेवा दिली आहे का?, ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन कसे आहे. शासनाचा आलेला निधी व इतर निधी व्यवस्थीत त्याच कामावर खर्च झाला का?, त्याचा ताळेबंद व्यवस्थीत आहे का?, या सर्व प्रक्रीया पारदर्शक पणे पार पडत आहेत का?, तंत्रज्ञाचा वापर होत आहे का? तसेच सौर उर्जेचा वापर गावामध्ये होत आहे का? पर्यावरणाच्या संदर्भात कामे झाली का? शासनाच्या योजना राबविल्या आहेत का आदी बाबींच्या तपासणी तालुका स्तरीय टिमने केली आहे. सदर तपासणीचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. त्यानुसार सदर आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.