27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeमहाराष्ट्र१० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा

१० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी
सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा असे शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती.

बिहार निवडणुकीपूर्वी सरकारने तिथे मोठ्या प्रमाणात पैसे वाटले. त्यामुळे तिथे वेगळा निकाल लागण्याची शक्यता नव्हती.
महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वत: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयु आघाडीचा देदीप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग पाचव्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील दावा केला आहे.

तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे.

१० हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही
निवडणुका स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण १० हजार रुपये देणे, ही काही लहान रक्कम नाही. महिलांना एवढी मोठी रक्कम द्यायची आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जायचे, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक व स्वच्छ होत्या का? याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

पदाधिका-यांना सर्वाधिकार
पत्रकारांनी यावेळी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली, अशी युती पुण्यातही होईल का? असा प्रश्न केला. त्यावर शरद पवार यांनी आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरील पदाधिका-यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे सांगितले.

‘जो जीता वही सिकंदर’ – देवेंद्र फडणवीस

‘जो जीता वही सिकंदर..’ हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणे विरोधी पक्षाला मान्य नाही. ख-या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करण्याची संधी सर्वांना होती. त्यांचं सरकार होतं, तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाहीत, आम्ही योजना आणल्या. लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यात लोकांना दोष देण्याचे कारण काय? असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR