शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने अधिग्रहणाची कार्यवाही सुरू केली आहे. तालुक्यातील ११ गावांमधून अधिग्रहणाचे ३२ प्रस्ताव शासनाकडे दाखल झाले असून, त्यापैकी २९ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. सध्या सर्व गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, अद्याप एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.
तालुक्यातील ७९ सार्वजनिक हातपंपांतील पाणी आटले आहे. काही गावांमधील हातपंप नादुरुस्त असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हातपंप दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि सांडपाणी व्यवस्थेची स्थिती समाधानकारक आहे. जनावरांसाठीही पाण्याची उपलब्धता पुरेशी असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रकल्पांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, पाण्याची पातळी खालावत आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा घटत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.
















