लातूर : प्रतिनिधी
इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. गुरूवारी चौथी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहिर झाली असून दिवसभरात ८७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून आज पर्यंत चार फे-यामध्ये जवळपास २० हजार ८४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. चौथ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या चार गुणवत्ता यादी नंतर पाचवी यादी ही अंतीम असणार आहे.
इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रीया लवकर मार्गी लागवी म्हणून इयत्ता १० वी च्या परीक्षा निकालही यावर्षी लवकर लावण्यात आला. तसेच शिक्षण विभागाने या वर्षापासून इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र तांत्रीक कारणामुळे प्रवेश प्रक्रीया राबविण्यासाठी उशिर झाला. पहिल्या यादीनंतर प्रवेश प्रक्रीयेला वेग आला आहे. इयत्ता ११ वी च्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन नोंदणी केली. अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश सध्या सुरू आहेत. या चार फे-यामध्ये आज पर्यंत २१ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यात पहिल्या फेरीत ११ हजार ७३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. दुस-या फेरीत ५ हजार ११९ विद्यार्थ्यांचे प्रवेश, तिस-या फेरीत २ हजार ३५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर चौथ्या प्रवेश फेरीत ८७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दि. २ ऑगस्टची शेवटची मुदत असणार आहे.

