नवी दिल्ली : अल निनोचा प्रभाव संपूर्ण देशात दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक भागातील पावसाची तूट वाढताना पाहायला मिळत आहे. याचा परिणाम जलसाठ्यांवर झालेला दिसत आहे. पाऊस कमी झाल्याने अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. शेतकरी बांधवही संकटात आहेत. अशातच देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील ३ दिवसांत हे क्षेत्र ओडिशापासून गुजरातपर्यंत पुढे सरकण्याचा अंदाज आहे. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, केरळ, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वादळी वारे वाहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१२ सप्टेंबर रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, १२ सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील ४ जिल्हे वगळता संपूर्ण राज्यासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. १३ सप्टेंबर रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला असून नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी १३ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, यंदा राज्यात पावसाचे प्रमाण असमान आहे. अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी बहुतांश भाग कोरडे होते. पुढील दोन दिवसांत हवामान प्रणालीच्या सक्रियतेमुळे हवामान विभागाने राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात मुसळधार पावसाची, तर काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे.
















