शस्त्रास्त्रेही जप्त, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
हैदराबाद : प्रतिनिधी
माओवाद्यांची सर्वात घातक तुकडी मानल्या जाणा-या पीएलजीए बटालियन क्रमांक १ सह तेलंगणा स्टेट कमिटी आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या तब्बल १३० माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या माओवाद्यांनी एके-४७, एलएमजी, एसएलआर, इंसाससारख्या १२४ घातक शस्त्रांसह तब्बल ५२०५ जिवंत गोळ््या तसेच अनेक ग्रेनेड आणि यूबीजीएल हे रॉकेट लाँचरसारखे शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासमोर माओवाद्यांनी आत्मसर्पण केले.
आत्मसमर्पण करणा-यांमध्ये पीएलजीए बटालियन-१ व बटालियन-२ चे कमांडर एंड्री कलिथराम उर्फ उइके कल्लू, कोरसा लक्कू तसेच डीके एसझेडसी सदस्य चलसानी नवथा उर्फ चंद्रा यांसारखे वरिष्ठ माओवादी नेतेही आहेत. माओवादी संघटनेच्या ३ प्रमुख घटकांपैकी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) ही महत्त्वाची संघटना होती. मोठ्या संख्येने कॅडरनी शरणागती पत्करल्याने या संघटनेचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे अधिका-यांनी म्हटले.
आत्मसमर्पण करणा-या १३० माओवाद्यांमध्ये सर्वाधिक ४२ माओवादी पीएलजीए बटालियन क्रमांक १ चे आहेत तर ३० माओवादी तेलंगणा स्टेट कमिटीचे आहेत, १६ माओवादी सेंट्रल रिजनल कमांडचे आहेत. विशेष म्हणजे माओवाद्यांचा विद्यमान जनरल सेक्रेटरी देवजीने काही दिवसांपूर्वीच तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसर्पण केले होते, त्याच देवजीच्या सुरक्षा तुकडीतील १० माओवाद्यांनी आज पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवले.
मुख्यमंत्री रेड्डी यांच्या
आवाहना प्रतिसाद
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याचे तेलंगणा सरकारने म्हटले आहे. कुटुंबासोबत शांततेत जीवन जगण्यासाठी आणि पुनर्वसन योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

