आळंदी : प्रतिनिधी
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््याने माऊली-माऊलीच्या जयघोषात पंढरपूरसाठी आज प्रस्थान ठेवले. उद्या ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. त्यामुळे देहू-आळंदीत वारक-यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. त्यातच या पालखी सोहळ््याच्या निमित्ताने आळंदी आज भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असतानाच माऊलींवर श्रद्धा असलेल्या नांदेडमधील एका दाम्पत्याने एक अलंकारिक मुकूट आज आळंदीत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण केला.
भाविकांकडून नेहमीच आपली श्रद्धा व्यक्त करताना श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानी दान अर्पण केले जाते. अनेकदा हे दान मौल्यवान वस्तूंच्या स्वरुपातही असते. महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांकडून दर्शन घेत दान अर्पण केले जाते. आज आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नांदेडच्या भाविक दाम्पत्याने सोन्याचा मुकूट अर्पण केला. आळंदीची भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा अद्वितीय संगम असलेला एक अलंकारिक मुकूट आज अर्पण केला.
नांदेड येथील भारत रामीनवार आणि मिरा रामीनवार या भक्त दाम्पत्याने सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा आणि १ किलो शुद्ध सोन्यापासून बनवलेला हा मुकुट ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे अर्पण केला. या मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण आदी मंगल धार्मिक प्रतिकांची कलात्मक मांडणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वारकरी परंपरेशी नाते असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला. त्यामुळे त्याला अधिक पावित्र्य लाभले आहे.
या विशेष प्रसंगी योगी निरंजननाथ (प्रमुख विश्वस्त), डॉ. भावार्थ देखणे (विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख), ज्ञानेश्वर वीर (व्यवस्थापक) आणि अॅड. राजेंद्र उमाप (विश्वस्त) हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत माऊलींना हा अलंकार भक्तिपूर्वक अर्पण करण्यात आला. हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी माऊलींना परिधान करण्यात येणार असून, भाविकांसाठी तो श्रद्धा, भक्ती आणि अभिमानाचे प्रतीक ठरेल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारंपरिक श्रद्धेची अशी साजेशी मांडणी ही काळाशी सुसंगत अशी भक्तीची अभिव्यक्ती म्हणावी लागेल. रामीनवार दाम्पत्याच्या या अद्वितीय अर्पणामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेत जोडलेली ही कलाकृती भाविकांच्या मनात अढळ स्थान मिळवेल, असा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला.
चार महिन्यांच्या अथक
प्रयत्नांतून साकारला मुकूट
या मुकुटाची निर्मिती सुप्रसिद्ध पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. यांनी केली असून, चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून तो साकारला आहे. पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची सूक्ष्म कोरीव रचना आणि आधुनिक 3ऊ तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय यामध्ये पाहायला मिळतो.