पुणे: प्रतिनिधी
ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने दि. २० मे रोजी देशव्यापी बंदची घोषणा केली आहे देशभरातील सुमारे साडे बारा लाख औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे पुणे अध्यक्ष संदीप पारख यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर तरतूद नसताना देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन विक्री सुरू आहे.
कोरोना काळात औषधांची होम डिलिव्हरी करण्यासाठी सरकारने तात्पुरती सूट दिली होती. महामारी संपल्यानंतरही ती मागे घेण्यात आलेली नाही.या परिस्थितीचा फायदा घेत ऑनलाईन कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलती देत बाजारपेठ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे लहान औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
केंद्र सरकार,संबंधित मंत्री आणि अधिका-यांकडे वारंवार निवेदने देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले.महाराष्ट्रात हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
















