लातूर : प्रतिनिधी
येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहिती वरून दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री गरुड चौक परिसरात सापळा लावून गौण खनिज (वाळू) ची विनापास परवाना अवैध वाहतूक करणारा टाटा कंपनीचा हायवा टिप्पर (क्रमांक एमएच २४ एयू ३८८८ ताब्यात घेण्यात आला. २० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर वाहनात सुमारे ४ ब्रास वाळू आढळली असून प्रशांत मुरलीधर बंडेवाड (वय ३४ वर्षे, रा. कोळवाडी, ता. अहमदपूर) चालक व विजयकुमार पाटील (रा. परचंडा, ता. अहमदपूर) वाहनमालक वरील दोघांविरुद्ध शासन परवानगीशिवाय वाळूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक प्रशांत बंडेवाड यास अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार रामलिंग शिंदे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुराब पठाण, पाराजी पुठेवाड यांनी केली आहे.
















