वडीगोद्री/अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज, शनिवारी (दि. १२) पंधरावा दिवस उजाडला. राज्यभरातून लाखो मराठा बांधव आणि महिला-भगिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या ऐतिहासिक व राज्यव्यापी महाबैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर बहुप्रतीक्षित मुंबई कूचची अधिकृत घोषणा केली.
आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जायचे आहे. १५ सप्टेंबरला मुंबईसाठी अंतरवाली येथून निघणार. रस्त्यात कोणी कितीही खुन्नस दिली तरी त्याला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवू नका; डोळ्यांसमोर समाजाची वेदना आणि मुलांचे भविष्य ठेवा. कोणत्याही मार्गाने गेलो तरी यंदा जिंकूनच यायचे आहे, असा एल्गार जरांगे पाटील यांनी जनसागराला संबोधित करताना केला.
दुपारी १२ वाजता बैठक सुरू होण्यापूर्वीच अंतरवाली सराटी परिसर मराठा बांधवांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेला होता. हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगवे रुमाल फिरवत तरुणांनी परिसर दणाणून सोडला. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘मुंबई मुंबई… आता कुठे जायचं? मुंबईला जायचं!’, ‘लढेंगे, जितेंगे… हम सब जरांगे’,‘मनोज दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ आणि ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
समाजाची वेदना डोळ्यांसमोर ठेवा
उपस्थितांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबईला जाण्याचा आपला निर्णय पक्का आहे. शांततेच्या मार्गाने, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण आपली ताकद दाखवणार आहोत. रस्त्यात कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका. आपल्या लेकरांचे कल्याण करणे हेच आपले एकमेव ध्येय आहे.
















