नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संसदेचे या वर्षाचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून चालू होणार आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. येत्या २१ जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होईल. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर शासकीय नियमाअंतर्गत चर्चा होणार आहे.
तीन महिन्यांच्या विरामानंतर संसदेच्या दोन्ही सत्रांचे अधिवेशन २१ जुलैपासून चालू होईल. २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरूवात होईल. याआधी संसदेचे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी चालू झाले होते. राज्यसभा आणि लोकसभेचे दोन्ही अधिवेशन ४ एप्रिल रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले होते. २०२५ सालातील हे पाहिले अधिवेशन होते. आता २१ जुलै रोजी २०२५ सालाचे दुसरे अधिवेशन चालू होईल.
रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. सरकारसाठी प्रत्येक अधिवेशन हे विशेषच असते. त्यामुळे या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवरही चर्चा होईल, असे रिजिजू यांनी सांगितले. सर्वांनाच सोबत घेऊन आम्हाला हे अधिवेशन यशस्वी करायचे आहे. त्यासाठी आम्ही विरोधी पक्षांशीही संपर्क साधला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
विशेष सत्राचे आयोजन होणार नाही
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी सरकारने विशेष सत्राचे आयोजन करावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यासाठी एकूण १६ पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले होते. मात्र आता विशेष सत्र होणार नसून नियमित पावसाळी अधिवेशनातच नियमांच्या अधीन राहून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जाईल.