लातूर : प्रतिनिधी
दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांच्या मातोश्री स्वर्गीय चंपाबाई नामदेव नागरगोजे यांचे महाळंग्रावाडी येथे वृद्धापकाळाने दि. १४ जुलै २०२० रोजी निधन झाले. त्यांच्या तिथीनुसार सहाव्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी पारंपरिक पद्धतीने पूजन करून स्मरण करण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त होणा-या अनावश्यक खर्चाला फाटा देत डॉ. नागरगोजे, त्यांच्या पत्नी रेश्मा नागरगोजे, मुलगा श्रीनिवास व ओम यांनी दयानंद कला महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणा-या गरजू व होतकरू २१ विद्यार्थिनींचे वार्षिक शैक्षणिक शुल्क २१ हजार रुपये भरून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मातोश्रींची पुण्यतिथी साजरी केली.
२१ विद्यार्थिनींच्या शैक्षणिक शुल्काची २१ हजार रुपयांची रक्कम दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, अधीक्षक संजय व्यास, विकास खोगरे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, डॉ. नागरगोजे कुटुंबीयांनी यापूर्वीही अशाच प्रकारे विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मदत केली असून आतापर्यंत १२६ विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क भरले आहे.
















