पुणे : प्रतिनिधी
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांसाठीच मोठ्या आनंदाचा उत्सव. मात्र ज्यांच्या नावातच ‘गणेश’ आहे, अशा गणेश भेळने यंदा अतिशय अनोखा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे योजले आहे. पाणीपुरीच्या २१ हजार पु-यांचा वापर करून १३ फूट उंच आणि १० फूट रुंद असा आगळावेगळा गणपती साकारला आहे. नामदार गोखले पथावरील गणेश भेळच्या दालनाबाहेर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. गणेश भेळचे संस्थापक रमेश गुडमेवार व छाया गुडमेवार यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे.
मूर्तीवरील या पु-या १२ दिवस आहेत, तशाच राहाव्यात यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. अशाप्रकारे अनोख्या रीतीने गणपती साकारण्याचे यंदाचे चौथे वर्ष असून, दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन गणेश भेळ ग्राहकांसमोर येत असते. ही मूर्ती तयार करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. या सर्व पु-या आपल्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. तर कलाकार प्रशांत साळुंखे यांनी ही मूर्ती प्रत्यक्षात साकारली आहे.
या पु-या तयार करण्यासाठी वाया जाणा-या/उरलेल्या पिठाचा पुनर्वापर करण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या संरचनेसाठी बांबू आणि कागदासारख्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. पुनर्वापर आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा हा गणेश भेळचा प्रयत्न आहे, असे रुपेश गुडमेवार यांनी सांगितले.
















