लातूर : एजाज शेख
जिल्ह्यातील संपूर्ण मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) केवळ ३६२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस लातूरच्या वार्षिक सरसरीच्या (७०६ मीमी) केवळ ५१.४ टक्के इतकाच आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून भूजल पातळी सुमारे ४.५८ मीटरने खाली गेली आहे. सध्या टंचाईग्रस्त गावांमध्ये २३५ बोअरवेल्स व विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागत आहे. काही गावांमध्ये आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रब्बी हंगामावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. पुरेशा पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचीच टंचाई जाणवत असेल तर रब्बी पिकांना पाणी कुठून मिळणार, अशी स्थिती आहे. दुसरीकडे हंगामात लागवडच झाली नाही तर संपूर्ण ग्रामीण कृषी अर्थ व्यवस्थाच अडचणीत येणार आहे.
आगामी ६ ते ८ महिने सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जलसंपदा विभागाने महानगरपालिका व नगरपरिषदांच्या सहकार्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे तसेच ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक ती कार्यवाही करणे महत्वाचे ठरणार आहे. प्रकल्पनिहाय पाणी आरक्षणानुसार पुढील ऑगस्ट महिन्यापर्यंतचे नियोजन महत्वाचे आहे. ज्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत पाणी पुरण्याची शक्यता नाही, तेथे पर्यायी जलस्रोतांचा शोध घेऊन तातडीने आराखडा तयार करणे अपेक्षीत असताना प्रशासनाकडून अद्याप तरी तशी हालचाल दिसून येत नाही. लातूर शहरासह सर्व नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामीण भागातील शासकीय विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) व हातपंपांची त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागात सक्षम पर्यायी जलस्रोत शोधणे, जल जीवन मिशनच्या अंतिम टप्प्यातील योजना लवकरात लवकर कार्यान्वित करणे आगामी पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
















