बदलापूर : प्रतिनिधी
बदलापूरच्या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. महाराष्ट्रातील घटना ही महाराष्ट्रालाच काळिमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. या गंभीर प्रश्नावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा केली आणि येत्या २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक आम्ही दिली असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. बदलापूर प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे. परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले. सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळाली असे नाना पटोले म्हणाले.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, मला या घटनेत राजकारण करायचे नाही. मात्र, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचे काम रोज राज्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित करण्यात येत आहे आणि काळे लावण्यात येत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
महायुतीतील एका पदाधिका-यांनी एका महिला पत्रकारासोबत अतिशय विकृत शब्दांत या घटनेवर भाष्य केले. ही घटना निषेधार्ह असून त्यांना या घटनेशी काहीही देणेघेणे नसल्याचे यातून दिसून आले आहे. या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही येत्या २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देत आहोत. या आंदोलनात महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा-कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. सध्या घडीला महाराष्ट्रात जे अकार्यक्षम सरकार आहे, त्याला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न नागरिक करतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केला. आज मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर नाना पटोले यांनी ही घोषणा केली आहे.
अॅड. निकम यांच्या नेमणुकीवर वडेट्टीवारांची टीका
बदलापूर अत्यार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाशी संबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली आहे, ज्याने लोकसभेची निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.