20 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeलातूर२७ हजार शेतक-यांना अनुदान

२७ हजार शेतक-यांना अनुदान

जळकोट : ओमकार सोनटक्के
राज्य सरकारने गतवर्षी झालेल्या नुकसानीमुळे राज्यभरातील कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. आता या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून जळकोट तालुक्यामध्ये २५४६७ सोयाबीन उत्पादक, २१८१ कापूस उत्पादक शेतकरी आहेत अशा एकूण जळकोट तालुक्यातील २७५८५ शेतक-यांंना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान खात्यावर जमा झाले आहे जळकोट तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम डीबीटी मार्फत जमा झाली आहेत. यामुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांंना दिलासा मिळाला आहे .
    कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्याकिंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप  हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दि.११ जुलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली होती .
   राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांंना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १००० रु तर ०.२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर ५,००० रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील. असा निर्णय शासनाने घेतला होता. शेतक-यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लीक्ड बैंक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येणार होते. सदर योजना फक्त सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठीच हे अनुदान वितरित करण्यात आले आहे जळकोट तालुक्यातील जवळपास ८० ते ९० टक्के शेतक-यांना दि १ ऑक्टोबर रोजी पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे. जळकोट तालुक्यात २१ हजार वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत तर सहा हजार सामायिक खातेदार शेतकरी आहेत. जळकोट तालुक्यातील २७ हजार  शेतक-यांंना जवळपास २० कोटी रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR