देवणी : बाळू तिपराळे
तालुक्यात यंदा पावसाअभावी भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम शेतीबरोबरच पशुधनावरही होत आहे. तालुक्यातील २१ व्या पशुगणनेनुसार एकूण २७ हजार ७८२ पशुधन आहे. या पशुधनासाठी दररोज सुमारे २९६.११८ मेट्रिक टन हिरवा व सुका चारा आवश्यक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार तालुक्यात ५ हजार ५९९ लहान पशुधन, १३ हजार ६५ मोठे पशुधन, तसेच शेळ्या व मेंढ्यांची संख्या ९ हजार ११८ आहे. पशुधनाच्या उदरनिर्वाहासाठी दररोज १०४.३०५ मेट्रिक टन सुका चारा आवश्यक आहे. याशिवाय जनावरांना मुरघास स्वरूपातील चा-याची गरज दररोज १३६.०३४ मेट्रिक टन इतकी आहे. हिरव्या चा-याची गरजही मोठी असून, पावसाअभावी चारा उत्पादन घटल्याने पशुपालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
चारा लागवडीसाठी मनरेगाचा आधार
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन करता यावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतजमीन आणि ग्रामपंचायतीच्या जमिनीवर चारा लागवडीच्या कामांना मंजुरी दिली आहे. उपलब्ध शासन निर्णयाच्या माहितीनुसार, वैयक्तिक जमिनीवरील चारा लागवडीसाठी ७ हजार ४९० रोपांना, तर ग्रामपंचायत जमिनीवरील लागवडीसाठी ५ हजार रोपांना मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून चारा उत्पादन वाढविणे आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे हा उद्देश आहे.
















