लातूर : प्रतिनिधी
लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या सरकारी १७,३६१ रूपये रकमेच्या अपहार प्रकरणातील आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले आहे. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०/१९९८, कलम ४०९, ४६७, ४६८, ४७१ भारतीय दंड संहिता अन्वये दाखल असलेल्या तसेच आर.सी.सी. क्र. ६१२/२००२ व डॉर्मंट फाईल क्र. ०१/२०१२ मधील आरोपी संजय केशवराव देशपांडे (वय ६२ वर्षे, रा. हलगरा, ता. निलंगा) हा न्यायालयाच्या प्रक्रियेला सातत्याने हुलकावणी देत तब्बल २८ वर्षे फरार होता. आरोपी वास्तव्याचे ठिकाण वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. सदर आरोपी हा हलगरा शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना सरकारी रकमेचा अपहार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. तत्कालीन सहाय्यक अधीक्षक डाकघर, दक्षिण उपविभाग, लातूर यांच्या अखत्यारीतील हलगरा शाखा डाकघरात बचत खातेदारांच्या ठेव रकमांच्या व्यवहारात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.
चौकशीत एल. डी. सूर्यवंशी, कनिष्ठ लिपिक, प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा यांच्या आर.डी. खात्यातील रक्कम काढण्यासाठी त्यांनी नियमानुसार अर्ज सादर केला असतानाही आरोपीने त्यांना रक्कम अदा न करता त्यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून २,६८३ रकमेचा अपहार केला. तसेच हलगरा जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक के. एच. शिंगारे यांच्या खात्यातील रक्कमही बनावट कागदपत्रे व खोट्या स्वाक्ष-यांच्या आधारे काढून १४,६७८ रकमेचा अपहार केला. संबंधित खातेदारांनी चौकशीदरम्यान विड्रॉल फॉर्मवरील स्वाक्ष-या आपल्या नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते.
या दोन्ही घटनांमधून आरोपीने १७ हजार ३६१ इतक्या सरकारी रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार करून पोस्ट खात्याची अधिकृत नोंदवही व कागदपत्रे बनावट तयार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी आरोपीस नाममात्र अटक करण्यात आली होती; मात्र त्यानंतर तो न्यायालयीन कामकाजास गैरहजर राहत फरार झाला. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट व जाहीरनामा काढूनही तो मिळून येत नव्हता. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्याच दरम्यान विशेष पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना आरोपी औसा रोड परिसरात असल्याच्या माहितीची खातरजमा करून विशेष पथकाने सापळा रचत आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून गांधी चौक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढे आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी
सुनावली.
















