वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता घेताच मोठे निर्णय घेतले आहेत. आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा सध्या एका मोठ्या बदलातून जात आहे. नासा त्यांच्या सुमारे २,१४५ कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.
अमेरिकन मीडिया आउटलेट ‘पॉलिटिको’ने याबद्दल माहिती दिली आहे. कर्मचा-यांना काढून टाकणे हे बजेटमध्ये कपात करण्याच्या आणि एजन्सीच्या कामाला अधिक प्राधान्य देण्याच्या योजनेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
नासाच्या या निर्णयाचा वैज्ञानिक रचनेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. ‘पॉलिटिको’च्या अहवालानुसार, ज्या कर्मचा-यांना काढून टाकले जात आहे ते बहुतेक जीएस-१३ ते जीएस-१५ श्रेणीतील आहेत, ते अमेरिकन सरकारी सेवेतील वरिष्ठ पद मानले जाते. कामावरून काढून टाकलेल्या कर्मचा-यांसाठी नासाने तीन पर्याय दिले आहेत. १) लवकर निवृत्ती, २) बायआउट, ३) स्थगित राजीनामा.
नासाच्या प्रवक्त्या बेथानी स्टीव्हन्स यांनी रॉयटर्सला सांगितले की, आम्ही आमच्या मोहिमेसाठी वचनबद्ध आहोत, परंतु आता आम्हाला मर्यादित बजेटमध्ये प्राधान्य द्यावे लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात नासा आणि अमेरिकेच्या अंतराळ धोरणात अनेक बदल झाले आहेत. याचा परिणाम नासाच्या १८ हजार कर्मचा-यांच्या टीमवरही झाला आहे.

