23.1 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्र२ हजार बसेस भंगारात

२ हजार बसेस भंगारात

‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव; एसटी महामंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या २ हजार बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळाच्या (एमएसटीसी ) माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे. राज्यभरातील ३२ आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून, त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, वयोमर्यादेमुळे जुन्या झालेल्या बसेस भंगारात काढण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी सुमारे २ हजार बसेस भंगारात निघत असून, येत्या दोन ते तीन वर्षांत सुमारे ५ हजार बसेस भंगारात निघणार आहेत. पूर्वीच्या लिलावात २ ते २.५ लाखांना प्रत्येक बस, असा महसूल महामंडळाला मिळाला होता.

राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) राज्यातील सर्व सार्वजनिक प्रवासी वाहतूक महामंडळांना लिलावामध्ये केवळ राज्यातील बोलीदारांनाच सहभागी करण्याचे निर्देश दिले आहेत. याअगोदर देशभरातील बोलीदार या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत होते. आता त्यावर मर्यादा आल्या आहेत.
त्यासाठी राज्यात केवळ दोनच मोठे बोलीदार असून, एसटीच्या बसला योग्य दर मिळेल का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भंगार विक्रीतून मिळणारा एसटी महामंडळाचा महसूल कमी होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR