हैदराबाद : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १६३२ कोटी रुपयांची आहे. यातील सुमारे ५७% संपत्ती चंद्राबाबूंकडे आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्याकडे ८१० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता (रोख ठेवी, दागिने इ.) आणि १२१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता (घर, जमीन इ.) आहे. चंद्राबाबूंवर १० कोटी रुपयांचे कर्जही आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे फक्त १५.३८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ममता यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. निवडणूक सुधारणांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. २७ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत लढण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून ही माहिती घेण्यात आली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
सर्वात कमी संपत्ती असलेल्या इतर मुख्यमंत्र्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दुस-या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे फक्त ५५.२४ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन तिस-या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे १.१८ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये ३१.८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि ८६.९५ लाख रुपयांची अचल मालमत्ता समाविष्ट आहे.
अरुणाचलचे मुख्यमंत्री कर्जबाजारी
अरुणाचलचे मुख्यमंत्री सर्वात जास्त कर्जबाजारी आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे दुस-या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची एकूण मालमत्ता ३३२ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे सुमारे १६५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि १६७ कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे. तथापि, कर्जबाजारी मुख्यमंत्र्यांच्या यादीत खांडू अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्यावर १८० कोटींपेक्षा जास्त कर्जे आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तिस-या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे ५१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये २१ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ३० कोटी रुपयांची अचल मालमत्ता समाविष्ट आहे.

