23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeलातूर३० शेतकरी महिलांना 'सखी प्रेरणा' पुरस्कारांचे वितरण

३० शेतकरी महिलांना ‘सखी प्रेरणा’ पुरस्कारांचे वितरण

लातूर : प्रतिनिधी
स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका प्रेमाताई गोपालन यांचा जन्मदिवस दरवर्षी सखी प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच परंपरेनुसार यंदाही १ फेब्रुवारी २०२६ रोजी सखी प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण, महिला नेतृत्व आणि शाश्वत उपजीविकेसाठी उल्लेखनीय कार्य करणा-या ३० शेतकरी महिलांना ‘सखी प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या ३०० महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण महिलांच्या कार्याची दखल घेणे, त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि इतर महिलांना प्रेरणा देणे हा होता. कार्यक्रमाला मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ सौ. अंजली गुंजाळ तसेच अनिल पिसाळ हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.  प्रास्ताविकात दिलीप धवन यांनी सखी प्रेरणा दिवसाचे महत्त्व विशद केले. १९९३ मध्ये सुरू झालेल्या स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेने आजपर्यंत ८ राज्ये, ३५ जिल्हे, ११,५०० हून अधिक महिला लीडर्स, ७,१०,३६५ महिला उद्योजक आणि सुमारे ७० लाखांहून अधिक लोकांपर्यंत आपले कार्य पोहोचवले असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सौ. अंजली गुंजाळ यांनी प्रेमाताईंची विचारधारा प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी केवळ शेतीतील मजूर म्हणून न राहता उत्पादन प्रक्रियेत सहभागी होऊन शेतकरी म्हणून पुढे यावे, असे त्यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीचे फायदे, आरोग्यविषयक जागरूकता आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी महिलांची भूमिका यावर त्यांनी भर दिला. जिल्ह्यात अनेक महिला आज स्वत:चा व्यवसाय उभारून इतर महिलांनाही सक्षम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे महिलांच्या यशोगाथा ‘सखी’ पुस्तकाचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेमाताई गोपालन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प उपस्थित महिलांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयं शिक्षण प्रयोग, लातूर येथील संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR