नागपूर : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आज या सूचना देऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून एकट्या नागपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे. परिणामी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी या विद्यार्थ्यांवर जुन्याच गणवेशात झेंडावंदन करण्याची नामुष्की ओढवली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या जवळपास ३० हजार विद्यार्थी चालू सत्रातील शालेय गणवेशापासून वंचित आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात यावे लागणार आहे. ‘एक राज्य एक गणवेश’ या योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समान धोरण स्वीकारले आहे. यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणे अपेक्षित असते. मात्र अजूनही नागपूर जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित असल्याचे पाहायला मिळत आहे.