लातूर : प्रतिनिधी
इयत्ता १० वीचा निकाल घोषीत झाला आणि सर्वत्र गुणवत्तेची चर्चा सुरु झाली. परंतु, गरिबी परिस्थितीशी लढता लढता ३५ टक्के गुण घेऊन विक्रम करणा-या विद्यार्थ्यांचा दोष काय? त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना उमरगा तालुक्यातील कवठा येथील सेवाग्रामच्या गरीब की पाठशालामध्ये प्रवेश देऊन त्यांना आयुष्याच्या परीक्षेत पास करण्याचा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी केला आहे.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील मोहित नाईकवाडे या विद्यार्थ्याने १० वीच्या परीक्षेत सर्वच विषयांत ३५ गुण घेऊन ३५ टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला आहे. मोहित हा शिराढोण येथे चहाचे हॉटेल चालवणा-या गरीब पालकाचा मुलगा आहे. गरीबी परिस्थतीमुळे वडिलांसोबत हॉटेलमध्ये काम करीत करीत त्याने हे यश मिळवले आहे. तो १० वीच्या पुस्तकाच्या परीक्षेत पास झाला आता त्याला कॉपीमुक्त अभियानात १०० टक्के निकाल लागलेल्या कवठा येथील सेवाग्राम कनिष्ठ महाविद्यालयाच्या गरीब की पाठशालामध्ये प्रवेश देऊन त्याला आयुष्याच्या परीक्षेत पास करायचे आहे. लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील १० वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सेवाग्राम कवठा गरीब की पाठशालामध्ये ११ वी वर्गात प्रवेश जाईल. त्यांना आयुष्याच्या परिक्षेत पास करण्याची हमी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी दिली.
















