लातूर : प्रतिनिधी
रेणापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खारोळा येथे घडलेल्या घटनेत शेतातील कॉपर वायर चोरी करण्याच्या प्रयत्नानंतर संबंधित ३ अल्पवयीन मुलांना पकडून त्यांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरणात संबंधित ३ विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यावर चोरीसंदर्भातील गुन्हा स्वतंत्रपणे नोंद करण्यात आला आहे तर दुसरीकडे संबंधित मुलांना मारहाण करून कायदा हातात घेतल्याप्रकरणी संबंधित ३ विधी संघर्ष बालक यांच्यापैकी एक जनाच्या फिर्यादीवरून दोघांवर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर देडे पोलीस स्टेशन रेणापुर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्ती व संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधून शांतता व सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या प्रकरणातील सचिन नारायण राऊतराव वय ४० वर्षे, नितीन गोविंद शिंदे वय ३८ वर्ष यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या घटनेबाबत समाजमाध्यमांवर काही व्हिडिओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले असून त्यासंदर्भातही तांत्रिक तपास सुरू आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, दिशाभूल करणारे संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती प्रसारित करणा-यांविरुद्धही आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाचा स्पष्ट संदेश आहे की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. गुन्हा करणा-यावरही कारवाई होईल आणि कायदा हातात घेणा-यावरही तितक्याच कठोरपणे कायदेशीर कारवाई केली जाईल. समाजात शांतता, सलोखा आणि कायद्याचे राज्य कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.















