अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रेमाने, आदराने आणि भक्तिभावाने केलेल्या दानाची चोरी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अल्पावधीतच राम मंदिर देशातील प्रमुख मंदिरांपैकी एक बनले होते. परदेशातील लाखो भाविकांनी अयोध्येत येऊन रामाचे दर्शन घेतले. परंतु, आता चोरीचा मोठा कलंक या मंदिराला लागला आहे. या चोरी प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. राम मंदिर सीसीटीव्हीचे जुने फुटेज गायब झाल्याने तपास पथकासमोर नवा पेच उभा राहिला आहे.
राम मंदिरातील चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. गेल्या सहा दिवसांत ठोस पुरावे गोळा करणे हे तपास पथकासमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरत आहे. तपास करत असताना उघड झाले आहे की, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांचा बॅकअप केवळ ४५ दिवसांचाच उपलब्ध असतो. ४५ दिवसांपेक्षा जुने फुटेज डिलीट केले जाते. परिणामी, अनेक वर्षांचे फुटेज मिळणार नसल्यामुळे चोरीचे मूळ आणि कालावधी अचूकपणे निश्चित करणे अवघड झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार केल्याचा संशय
सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. एसआयटी आता फॉरेन्सिक तपासाद्वारे शक्य तितके जुने फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करेल. पूर्वीच्या व्हीडीओ रेकॉर्डच्या अभावामुळे अनेक महिन्यांपूर्वीचे फुटेज कथितरीत्या हटवण्यात आले होते हे सिद्ध करणे कठीण आहे. गेल्या दीड महिन्यात फुटेजमध्ये कोणतीही फेरफार झाली असेल, तर तांत्रिक पुरावा समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मर्यादित डिजिटल पुराव्यांमुळे तपास आता साक्षीदार, संशयित आणि संबंधित अधिका-यांच्या जबाबांवर अवलंबून आहे. यामुळे एसआयटीचा तपास दीर्घकाळ चालणारा आणि बहुस्तरीय असण्याची शक्यता आहे.
















