नागपूर : प्रतिनिधी
काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. हे सरकार देशात अद्याप चार राज्यांत एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ४ राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असे थेट आव्हान शरद पवार यांनी सरकारला केले आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी देशात वन नेशन, वन इलेक्शन असेल, अशी घोषणा केली होती.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे काल केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे.
दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यात सा-यांना उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार, हे अद्याप तरी समोर आलेले नाही. त्यामुळे याच मुद्द्याला घेऊन शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते नागपूर विमानतळावर आले असता ते बोलत होते.