चंदीगड : विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून ऐन पावसाच्या हंगामात जोरदार घोषणांचा पाऊस सुरू आहे. अशातच हरियाणा सरकारने गॅस सिलिंडर ५०० रुपयांना देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यात देशातील ४ महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या चारही राज्यातील निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा आहे. अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सोमवारी ‘हर घर हर गृहिणी योजना ’ पोर्टल लाँच केले आहे. याअंतर्गत राज्यातील अंत्योदय कुटुंबांना फक्त ५०० रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी हरियाणा सरकार गृहिणींना लाभ देण्यासाठी १५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. अहवालानुसार, या योजनेंतर्गत हरियाणातील सुमारे ५० लाख बीपीएल कुटुंबांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत.सध्या हरियाणात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास ९५० रुपये इतकी आहे.