26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeअंतरराष्ट्रीय५ वर्षात ९ लाख भारतीयांचे परदेशगमन!

५ वर्षात ९ लाख भारतीयांचे परदेशगमन!

नागरिकत्वाचा त्याग । भारतात दुहेरी नागरिकत्वाच्या सुविधेचा अभाव; परदेशी नागरिकत्वामुळे दीर्घकालीन स्थैर्याच्या अधिक संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भारतीय आपले नागरिकत्व सोडत असल्याचे चित्र समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत ९ लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे २०२२ पासून दरवर्षी ही संख्या २ लाखांच्या पुढे गेली आहे. २०११ ते २०२४ या कालावधीत एकूण २०.६ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक लोकांनी हे पाऊल गेल्या पाच वर्षांत उचलले आहे.

कोव्हिडपूर्व काळात जवळपास दहा वर्षे दरवर्षी सरासरी १.२ ते १.४५ लाख भारतीय नागरिकत्व सोडत होते. मात्र २०२० मध्ये, प्रवासावरील निर्बंधांमुळे ही संख्या सुमारे ८५ हजारांवर आली. कोव्हिडनंतर निर्बंध हटताच पुन्हा एकदा परदेशगमन वाढले आणि २०२२ पासून दरवर्षी २ लाखांपेक्षा अधिक भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला.

भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची सुविधा नसणे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. नागरिकत्व कायदा, १९५५ च्या कलम ९ नुसार, एखाद्या भारतीयाने परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. परदेशी नागरिकत्वामुळे मतदानाचा हक्क, सामाजिक सुरक्षा, कायमस्वरूपी निवास, सरकारी नोक-या आणि दीर्घकालीन स्थिरता मिळते. भारताचा ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड व्हिसामुक्त प्रवास आणि काही आर्थिक हक्क देतो, मात्र मतदान किंवा निवडणूक लढवण्यासारखे राजकीय अधिकार देत नाही.

भारतीय नागरिक कुठे जात आहेत?
भारतीय नागरिकत्व सोडणारे बहुतांश लोक अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडे वळत आहेत. या देशांचे पासपोर्ट अधिक आकर्षक असून रोजगार, शिक्षण आणि स्थैर्याच्या अधिक संधी उपलब्ध आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR