निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने हजारो रुपये खर्चून पेरलेला खरीप हंगाम हातचा गेला आहे. पिके करपली, पाण्याचे स्रोत आटले आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रब्बी हंगामाचीही शाश्वती नसताना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
दुष्काळाने शेतक-यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. शेतमजुरांच्या हातालाही काम नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांच्या तुटपुंज्या मदतीतून बियाणे, खते, शेतीचा खर्च, कर्जाचे हप्ते आणि सणासुदीच्या गरजा भागवायच्या कशा, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे. या मदतीतून दिवाळीचा साधा खर्च भागवणेही कठीण असल्याने शासनाच्या निर्णयाबद्दल नाराजी वाढत आहे. शेतक-यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना, दिवाळीपूर्वी केवळ पाच हजार रुपयांचे अग्रिम देण्याच्या घोषणेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. एक लाख रुपयांच्या मदतीपैकी उर्वरित ९५ हजार रुपये कधी मिळणार, याचे उत्तर शासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.
















