शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतक-यांना पाच हजार रुपये अग्रीम स्वरूपात दिले असले, तरी वाढत्या महागाईत या रकमेत दिवाळी साजरी करायची कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतीचा खर्च, कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांची चिंता असताना दिवाळीचा खर्च भागवणे कठीण झाले आहे.
किराणा, तेल, साखर, कपडे आणि फराळाच्या साहित्याच्या वाढत्या किमती पाहता पाच हजार रुपयांत सणाचा खर्च भागवणे जिकिरीचे ठरत आहे. शासनाची अग्रीम मदत तात्पुरता दिलासा देणारी असली, तरी पिकांच्या नुकसानीच्या तुलनेत ती कितपत पुरेशी ठरणार, हा प्रश्न कायम आहे. शेतक-यांच्या हातात पुरेसा पैसा नसेल, तर दिवाळीचा उत्साह आणि बाजारपेठेतील उलाढाल दोन्ही कसे वाढणार? त्यामुळे पाच हजारांच्या अग्रीम मदतीसोबतच दुष्काळी नुकसानीची भरपाई वेळेत मिळणे आणि आगामी हंगामासाठी आर्थिक आधार उपलब्ध होणे आवश्यक आहे.
खिशातील पैसा बाजारपेठेचा आधार! शेतक-यांच्या हातात पैसा आला की किराणा दुकानदार, कापड व्यापारी, सराफ, मिठाई विक्रेते आणि अन्य व्यावसायिकांची उलाढाल वाढते. मात्र, शेतक-यांची खरेदीशक्ती घटल्यास सणासुदीतील खरेदीवर मर्यादा येऊन ग्रामीण बाजारपेठेतील व्यवहार मंदावू शकतात. त्याचा परिणाम व्यापारी, वाहतूकदार, हमाल आणि छोट्या व्यावसायिकांवरही होतो.
















