रेणापूर: सिद्धार्थ चव्हाण
खरीप हंगाम पावसाअभावी हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांसमोर यंदा दिवाळी साजरी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत शेतक-यांना कितपत दिलासा देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाढत्या महागाईत पाच हजार रुपयांत किराणा, भुसार माल, कपडे, फराळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना शेतक-यांची दमछाक होणार असेल, तर या मदतीतून दिवाळीचा सण गोड कसा होणार, असा सवाल दुष्काळग्रस्त शेतक-यांतून उपस्थित होत आहे. एकीकडे उत्पादन घटल्याने शेतक-यांच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे, तर दुसरीकडे रब्बी हंगामाचीही शाश्वती नाही. शेतीसाठी केलेला खर्च, डोक्यावरील कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आगामी हंगामाची तयारी अशा अनेक जबाबदा-यांचा भार शेतक-यांवर आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतक-यांना दिलासा देण्याच्या घोषणा होत असताना प्रत्यक्ष हातात पडणारी मदत किती, हा कळीचा प्रश्न आहे.
















